मराठीचे जतन हा ‘एकं’ चा हेतू आहे.
वर्षानुवर्षे परदेशात राहिल्यामुळे मराठीचा हात आपल्या हातातून सुटतो आहे अशी खंत काहीजणांना आहे. मराठी शाळेत जाऊन मराठी शिकलेल्या ‘देशी’ मुलांना शिकलेली मराठी टिकवायची आहे. ‘आम्हाला वाचायला काय आहे? आम्हाला मराठी बोलायचे आहे, पण घराशिवाय कुठे बोलतां येईल?’ असे त्यांचे प्रश्न आहेत. काहीजणांना बोललेले समजते पण देवनागरी लिपीची सवय सुटल्यामुळे लिहिणे वाचणे कठीण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर ‘एकं’ची स्थापना झाली आहे.
आपली मराठी भाषा म्हणजे जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन. ‘हे विश्वचि माझें घर’ असा विशाल, निर्भर आणि सहिष्णू दृष्टिकोन, आपल्या मायबोलीमुळे आणि धर्मामुळे आपल्याला लाभला आहे. तो पुढच्या पिढीला पोचवायचा तर मराठी भाषेचे जतन अगत्याचे ठरते. त्यात आपलेही हित आहे आणि आपल्या मावसदेशाचे – अमेरिकेचेही.
आणि भाषेचे नाणे म्हणजे शब्द होय. म्हणूनच, ‘एकं’ (aickum.org) या संस्थळावर शब्दांचा प्रपंच मांडला आहे.
मराठीत प्रथमच न्यूयॉर्क टाईम्सचे प्रमाण नियम पाळणारीं संवादी शब्दकोडीं येथेच सोडवण्याची सोय केली आहे. आठवणीत खोल दडलेल्या शब्दांना, हीं कोडीं सोडवताना उजाळा मिळतो आणि विशेष आनंद होतो हे कित्येक उकलकऱ्यांनी लिहून कळवले आहे. ‘खिरापत’, ‘अर्थात्’ अशीं सोपीं कोडींही सोडवण्यासाठी उपलब्ध आहेत.
पूर्वी आंघोळीचं पाणी तापवण्याकरतां बंब असायचा. त्यात प्रत्येकाने आपली आंघोळ झाली की गार पाण्याची भर घालावी लागायची म्हणजे नंतर आंघोळ करणाऱ्यांनाही गरम पाणी आयते मिळायचे. आपण जर आजवर मिळालेल्या जगाच्या आणि विविध क्षेत्रातल्या माहितीला मराठीत आणून मराठीच्या बंबात भर घातली तर ती मराठीची सेवाच ठरेल. त्यासाठी लागणारे शब्द कदाचित शोधावे लागतील, कदाचित नव्याने घडवावे लागतील. पण मनावर घेतले तर काय अशक्य आहे? मुळात ‘एकता’मध्ये चालू केलेले ‘चपखल’ हे सदर याच उद्देशाने येथे चालू ठेवले आहे.
‘पुलं’ ना एकदाच आढळलेला शब्द, ‘उमाठा’, हा त्यांनी लिहून ठेवल्यामुळे त्याची तशी नोंद झाली. आपल्या किंवा आपल्या वडील मंडळींच्या बोलण्यात असे अनवट, हरपलेले शब्द असणारच. आपणही त्यांची नोंद, ‘एकं’ च्या ‘शब्दपेढी’त करून ठेवू शकतों.
सृष्टीतल्या कित्येक गोष्टींची नांवानिशी ओळख पटेल अशी दखल मराठी शब्दकोशात घेतलेली दिसत नाही. नक्की माहीत असलेल्या विशेषनामांची पध्दतशीर, खात्रीलायक सूची आपण करू शकतों. तीसुध्दा शब्दपेढीत जमा करतां येईल.
‘एकोपा’ हा ‘एकता’च्या धर्तीवरचा निकोप मराठी शेजार आहे. त्याचे बिऱ्हाड ‘एकं’वरच मांडले आहे. त्यात दर्जेदार मराठी साहित्याबरोबरच वर उल्लेखिलेलीं कोडींही असतील. इतर प्रयोगही केले जातील.
‘एकं’ संस्थळामध्ये,’एकोपा’ च्या छापील अंकामध्ये आणि पटांकामध्ये आपल्या सहभागाची रास्त अपेक्षा आहे.